-- होमिओपॅथी - एक शास्त्रशुद्ध उपचार पद्धती --

Written by

होमिओपॅथी म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतात त्या साबुदाण्यासारख्या लहान गोळ्या. होमिओपॅथीबद्दल लोकांच्या मनात समजापेक्षा गैरसमजच जास्त आहेत. हे गैरसमज दूर करणे व होमिओपॅथीबद्दल सखोल ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे हाच या लेखामागील उद्देश आहे. होमिओपॅथीचा शोध जर्मनीचे डॉ. सॅम्युअल हनेमान यांनी सुमारे 200 वर्षांपूर्वी लावला. होमिओपॅथी ही एक नैसर्गिक सिद्धान्तावर आधारित परिपूर्ण व निर्दोष वैद्यकीय शाखा असल्यामुळे यामध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर औषधे उपलब्ध आहेत. तसेच इतर शास्त्रांमध्ये ज्या आजारांवर इलाज नाहीत त्यातील काही आजारांवरदेखील होमिओपॅथीमध्ये इलाज होतो.
होमिओपॅथी ज्या सिद्धान्तावर आधारित आहे त्यापैकी काही सिद्धांतांची माहीती आपण करून घेऊ.

१. समान लक्षणांचा सिद्धांत :

या सिद्धांतावरच होमिओपॅथीचा पाया रचला आहे. निसर्ग नियमानुसार एखादे औषध त्याच्या मुळ अवस्थेमधे निरोगी माणसाला दिले असता त्या माणसामध्ये ज्या आजारासारखी लक्षणे दिसू लागतात तेच औषध त्यावर काही प्रक्रिया करून जर त्या आजारासारखी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णाला दिले असता त्याचा रोग पूर्ण बरा होतो हे डॉ. सॅम्युअल हनेमान यांनी सिद्ध करून दाखवले. म्हणजेच काट्याने काटा काढणे हा निसर्गाचा नियमच होमिओपॅथीमध्ये वापरला जातो. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम न होता नैसर्गिकरित्याच रोग्याचा रोग नष्ट होतो. डॉ. हनेमान यांनी याच नैसर्गिकसिद्धांताला होमिओपॅथीचा मुख्य सिद्धान्त मानून संपूर्ण होमिओपॅथीची उभारणी केली.

२. औषधांचे सिद्धीकरण:

औषधांचे सिद्धीकरण ही होमिओपॅथीमधील सर्वात महत्वाची व इतर शास्त्रांहुन अतिशय वेगळी प्रक्रिया आहे. औषधांचे सिद्धीकरण हे निरोगी मानवी देहावर केले जाते त्यामुळे ही अत्यंत शास्त्रशुद्ध व सर्वात निर्दोष सिद्धीकरणाची पद्धती आहे. होमिओपॅथीमधील सर्व औषधांचे सिद्धीकरण हे कोणत्याही प्राण्यावर अथवा प्रयोगशाळेत न करता निरोगी माणसावर केले जाते. त्यामुळे सर्व औषधांचे नेमके व अचूक गुणधर्म आपणास समजतात. यामध्ये शारिरीक लक्षणांबरोबर मानसिक बदल देखील अभ्यासला जातो, जो प्राण्यांवर प्रयोग करून कधीही सिद्ध केला जाऊ शकत नाही. म्हणुनच होमिओपॅथिक औषधे देताना रुग्णांच्या शारीरिक तक्रारींबरोबरच मानसिक बदल, स्वभाव, भावनिक जडणघडण यांची देखील माहिती घेऊनच औषधे दिली जातात.